शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 27 मे 2020 (13:18 IST)

केंद्राकडून कोरोनासाठी एक नवा पैसा नाही

कोरोना संसर्गाच्या उपायोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादान्त खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. दरवर्षीप्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा 1718.40 कोटींचा निधी आला आहे. त्यातील 35 टक्के निधी कोरोनासाठी खर्च करता येऊ शकतो. इतकेच काय ते केंद्राने केल्याची टीका आपत्ती व्यवस्थापनंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
 
नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेत फडणवीस खोटे बोलत आहेत. वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस खोटे बोला, नेटाने बोला या युक्तीचा  अवलंब करत आहेत. केंद्राने दरवर्षीप्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थपनासाठी 2020-21 साठी 4296 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील 40 टक्के निधी म्हणजे 1718.40 कोटींचा निधी हा राज्य आपत्ती व्यवस्थापन व रिसपॉन्ससाठी आहे. त्यानुसार सरकार राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी हा निधी खर्च करतो. या निधीत 75 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. या निधीतून पहिला हप्ता 1611 कोटी इतका निधी राज्य सरकारला मिळाला आहे. त्यातील 2020- 21 यावर्षी 35 टक्के निधी म्हणजेच 601 कोटी इतका निधी कोविडसाठी खर्च करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे.
 
राज्य  सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर ही परवानगी मिळाली आहे. यातून कोविडसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 171 कोटींचा निधी वितरित केला आहे. तर 156 कोटींचा निधी मंजूर करण्यास  राज्य कार्यकारी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. येत्या एक दोन दिवसात हा निधी दिला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. कोविडसाठी आतापर्यंत एकूण 327 कोटी मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने कोविडसाठी स्वतंत्र असा कुठलाही निधी दिला नाही. फडणवीस खोट बोलून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.